भोर तालुक्यातील २० हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
भोर : सर्व शिक्षण अभियानांतर्गत भोर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील पहिली ते आठवीच्या एकूण १९ हजार ५२९ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा फायदा होणार आहे. सर्व विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ जूनला पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी १५ जूनला सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळावेत या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. भोर तालुक्यात ३२५ शाळांना याचा लाभ होणार असून जिल्हा परिषद शाळा – २७४, अनुदानित खाजगी शाळा, नगरपालिका – ३, आश्रम शाळा – २ तसेच समाज कल्याणच्या एका शाळेला विभागामार्फत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.
बहुतांशी शाळांची वर्ग स्वच्छता शालेय स्वच्छता करून घेतली गेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, ग्रामस्थ, अधिकारी शाळेत जाऊन मुलांचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करनार आहेत. तर शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षक वृंद दोन दिवसांपासून गावात जाऊन पालकांच्या गाठीभेटी घेत आहेत. येत्या दोन दिवसात यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होणार असल्याने मागील वर्षी शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तर नवीन पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण आहे. पाठ्यपुस्तके वितरण करण्याचे नियोजन विषय तज्ञ सुनील गोरड, तानाजी तारू, प्रकाश बदक, विजय खुटवड , संतोष देशमुख, अंजली अहिरे, सुरेखा राजवडे, लता वाघोले यांनी इयत्ता व भाग निहाय केले.
शाळा पूर्वतयारी पूर्ण झाली असून पहिल्या दिवशी आनंददायी उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच नवागतांचे स्वागत गावातून प्रभात फेरी काढून पुष्पगुच्छ देउन करण्यात येणार आहे. विद्यार्थी १०० टक्के उपस्थित होण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली गेली आहे.
– राजकुमार बामणे(गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोर)