भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार परिणाम
भोर : भोर तालुका सह्याद्रीच्या डोंगर रांगानी व्यापलेला आहे. दळणवळण व विकासाच्या दृष्टीने मागासलेला असून बहुतांशी लोक खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांवर वास्तव्यास आहेत. पर्यायी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या जिल्हा परिषद शाळांना खूप महत्त्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवसंजीवनी ठरत असल्या तरी मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या वेळ- काढूपणा व नियोजनशून्य कारभारामुळे भोर तालुक्या तील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणा त रिक्त होती परंतु तीच परिस्थिती सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राहणार असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनपासून शिक्षकांवर ताण येणार असल्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. परिणामी पालकांचा इंग्लिश शाळांकडे कल वाढलेला असून यामुळे भविष्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्यादेखील रोडावण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण? असा सुर पालकांकडून निघत आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात, बदलत्या काळात पालकांचा पाल्यांसाठी इंग्लिश शाळांकडे वाढलेला कल आणि त्यातच शासनाने आरटीई मध्ये इंग्लिश शाळांचा केलेला समावेश व शैक्षणीक क्षेत्रात वाढलेली मोठी चुरस असताना भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांमधील शिक्षकांच्या मंजूर असलेल्या ७८३ पदांपैकी २८१ पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कामाचा ताण पडत आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे निवेदन देऊन मागणी केली जाते. परंतु यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.मात्र समानीकरण नियमानुसार शिक्षकांची भरती केल्यानंतर इतर तालुक्यातील शाळेतील अतिरिक्त शिक्षक दुर्गम डोंगरी भागात येऊ शकतात. परंतु या नियमाचे वरिष्ठ पातळीवर उल्लंघन होत असल्यामुळे तालुक्यात मागील वर्षी ४२ शाळा या शून्यशिक्षकी शाळा होत्या यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. तालुक्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील शिक्षकांची २३५ पदे रिक्त आहेत. यामध्ये ६ मुख्याध्यापक, ५८ पदवीधर शिक्षक आणि १४३ उपशिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यातील ४२ शाळांवर शिक्षकच नाहीत. त्यामुळे शेजारच्या शाळेतील शिक्षक हे तेथे पाठविले जात आहेत. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यात नेमणूक मिळालेल्या शिक्षकांपैकी जास्तीत जास्त शिक्षकांची नेमणूक भोर तालुक्यात करावी, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.
“जिल्ह्यातील शाळा दि. १५ जूनपासून सुरू होत असून भोर तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे प्रमाण जास्त आहे.पवित्र पोर्टलनुसार भोर तालुक्यात ४८ शिक्षकांची नव्याने नियुक्ती झाली असून हे शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेवर रुजू होणार आहेत”.
– संजय नायकोडी, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे
“तालुक्यात सध्या ४८ शिक्षक मिळाले असून ते आज व मंगळवार पर्यंत रुजू होणार आहेत. ज्या त्या शाळेच्या हद्दीतील सर्वेक्षण करुन दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार केली असून संबंधित शाळांना दिली असल्याने योग्य नियोजन झाले आहे”.
– राजकुमार बामणे, गटशिक्षण अधिकारी, भोर पंचायत समिती