जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉलेज भोर कडून जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन
भोर : राजगड ज्ञानपीठच्या जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉलेज भोरच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्ताने बुधवारी (दि. १५ जानेवारी) भव्य दिव्य आणि देखण्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भोर शहरातील राजवाडा चौक, मंगळवार पेठ, चौपाटी, पोलीस स्टेशन चौक आणि नवी आळी भोर मार्गे सम्राट चौकातून पुन्हा शाळेकडे असा मोठा पल्ला या रॅलीने पायी चालून पूर्ण केला.
या रॅली मध्ये माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सईबाई, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर सर्वच प्रमुख शिलेदार व मावळ्यांच्या वेशभूषेत इयत्ता अकरावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी चौका चौकातून जात असताना या सर्व ऐतिहासिक पात्रांची लोक पूजा करून रॅलीला शुभेच्छा देत होते.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅलीला एक वेगळंच स्वरूप प्राप्त करून दिलं होतं. शाळेच्या नावाचा मुख्य फलक, तसेच माँसाहेब जिजाऊंची शिकवण देणारी वाक्ये असणारे इतर सुमारे ५० वेगवेगळे फलक या रॅलीमध्ये स्वतः विद्यार्थ्यांनी बनवून वापरले होते. रॅलीसोबत शाळेचे वाद्य पथक देखील चौकाचौकात वादन करून रॅलीला रंगत आणत होते.
भोरमधील मुख्य चौक चौपाटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन केले. याप्रसंगी अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख हे देखील उपस्थित होते.
रॅली यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी माध्यमिक विभागाच्या प्राचार्या रुबिना सय्यद यांनी मार्गदर्शन केले. माँसाहेब जिजाऊ यांची जयंती १२ जानेवारीला असते, परंतु रविवार असल्या कारणाने आज म्हणजे बुधवार १५ जानेवारीला आयोजित करण्यात आली असे त्यांनी नमूद केले. यावेळी ज्युनिअर कॉलेजचा सर्व स्टाफ रॅलीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांची काळजी घेत रॅली यशस्वीपणे पूर्ण केली.
या उपक्रमासाठी राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आनंतरावजी थोपटे, कार्याध्यक्ष मा. संग्रामदादा थोपटे आणि मानद सचिवा सौ. स्वरूपाताई थोपटे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.