यंदा पंढरपूरच्या वाटेवर वारकऱ्यांच्या साथीला राज्याचा आरोग्य विभाग; कसे असेल नियोजन? सविस्तर वाचा
पुणे : आषाढी एकादशीला विठुनामाच्या जयघोषात विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दिंड्यामधून पंढरपूरकडे मोठ्या संख्यने वारकरी रवाना होतात. या प्रवासादरम्यान ऊन, वारा,पाऊस अंगावर घेत हे वारकरी मार्गक्रमण करत असतात. यात बदलत्या हवामानामुळे दिंड्यांमधील अनेक वारकरी आजारी पडत असतात, अशा आजारी वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज केला जातो. यावर्षी देखील आजारी वारकऱ्यांची काळजी घेतली जाणार आहे.
आषाढी एकादशीला राज्यभरातून एकूण १०७९ दिंड्याद्वारे १२ लाखाहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे त्यांना सर्व सुविधा मिळण्यासोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील पालखी मार्गावर पाच किलोमीटरच्या अंतरावर फिरते दवाखाने, रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारात्मक सुविधांवर देखील सरकारने लक्ष ठेवले आहे.
यात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन प्रमुख व मोठ्या दिंड्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजाच्या दिंडीचा मार्ग आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटन, बरड, नातेपोते, माळशिरस, वेळापूर, वाखरी व शेवटी पंढरपूर असा राहतो. तर, तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर मार्गे पंढरपूरला जाते. मार्गात असलेला सुमारे ४ किमी अंतराचा दिवेघाट हा अत्यंत खडतर असाच आहे. मात्र वारकरी विठुनामाच्या जयघोषात व टाळमृदंगाच्या गजरात हा अवघड घाट लिलया पार करतात.
दिंडीचा पहिला मुक्काम असलेल्या आळंदी येथे ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग तसेच आनंदी मार्गावरील आठ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सज्ज केले आहेत. याशिवाय पुणे जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा व पुणे मनपा कमला नेहरू रुग्णालय येथे अतिदक्षता विभाग तर मार्गावरील नऊ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सज्ज ठेवण्यात आले आहेत.
सासवड येथील ग्रामीण रुग्णालय येथे अतिदक्षता विभाग तर सासवडमधील सात एचबीटी दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहेत. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच आसपास असलेले ७ एचबीटी दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहेत.वाल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयसीयू तर नीरा नदी पुलाजवळ दोन रुग्णवाहिका पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
लोणंद येथे अतिदक्षता गृह तर लोणंद येथील तीन एचबीटी केंद्र तसेच तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता विभाग तर आसपासच्या परिसरातील चार अतिदक्षता गृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्व रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, एचबीटी दवाखाने तसेच अन्य दवाखाने अशा ठिकाणी एकूण सर्व प्रकारचे डॉक्टर, नर्स, आशासेविका मिळून ३ हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. मागील वर्षी सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत केलेल्या उपाययोजनांमुळे ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देता आली होती.