शिवरायांच्या जयघोषात सारोळे येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा
सारोळे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला राज्याभिषेक पार पडला होता. त्यानुसार तिथीप्रमाणे श्रीमंत दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान, सारोळे(ता.भोर) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आज गुरुवारी(दि. २० जून) साजरा करण्यात आला. हा ऐतिहासिक दिवस सर्वांच्या स्मरणात असून, खास आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धभिषेक, जलाभिषेक आणि पुष्पाभिषेक घालून हा सोहळा विधिवत आणि थाटामाटात पार पडला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूना पराभूत करुन भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात शिवरायांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळाले. आजही प्रत्येक माणसाच्या मनात शिवरायांचे स्थान अबाधित आहे. त्यांचे हे महान कार्य डोळ्यासमोर ठेऊन श्रीमंत दुर्गामाता सेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून पहाटे ६ वाजता ह्या सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. छत्रपती “शिवाजी महाराज की जय”, हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच यावेळी शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक ध्येय-मंत्र, प्रेरणा मंत्र आणि आरतीच्या निनादात शिवरायांच्या जयघोषात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत दुर्गामाता सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.