सिनेस्टाईल घटना : अनोळखी तीन महिलांनी बसमध्ये खंडाळ्यातील महिलेचे तब्बल साडे तेरा लाखांचे दागिने लुटले; योगायोगाने पुन्हा प्रवास करताना त्यातील एका महिलेला पकडले

नसरापूर : गावाकडे जमिनीचे खरेदीखत असल्याच्या कारणास्तव मुंबई ते खंडाळा असा बसने प्रवास करत गावी निघालेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिची दिशाभूल करून तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या तीन महिलांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील संशयित एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलजा राजु भोगे (वय ३८ वर्ष, रा. औरंगाबाद, चिखल ठाणा) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. या घटने बाबत मालन विलास गायकवाड (वय ५६ वर्ष, सध्या रा. कुर्ला वेस्ट, मुंबई, मुळ रा. भोसलेवाडी, पोस्ट अहिरे, ता. खंडाळा जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मालन गायकवाड या खरेदी खतासाठी लागणारे पैसे देण्याकरिता गावी खंडाळा येथे जाण्यासाठी मुंबई-कराड बसणे गुरुवारी (दि. १६ जानेवारी) सकाळी प्रवास करत निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या कडे रोख रक्कम व दागिने असलेली बॅग होती. त्यामध्ये मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस, लक्ष्मीहार, अंगठी इत्यादी दागिने तसेच ६ लाख १० हजार रुपये रोख रक्कम होती. यादरम्यान प्रवास करताना ही बस लोणावळा – वाकड मार्गे नवले ब्रिज येथे सकाळी ११:३० वाजता पोहोचली. त्याठिकाणी बस मध्ये तीन महिला प्रवासी बसल्या. त्यातील एका महिलेकडे लहान मुल होते. या सर्व महिला फिर्यादी महिलेच्या आजू बाजूच्या सिट वर बसल्या होत्या. बस नसरापूर (ता.भोर) जवळ पोहोचली असता त्यातील एका महिलेने सिट खाली पैसे टाकत तुमचे पैसे खाली पडले आहेत असे फिर्यादी महिलेला सांगितले.

Advertisement

यांनतर या सर्व महिलांनी त्यांच्यापाशी घोळका करत पैसे गोळा करण्यासाठी खाली वाकू लागल्या. तितक्यात एका महिलेने त्यांच्या जवळील पैसे व दागिन्यांची बॅग ओढून घेतली. यांनतर लगेचच त्या महिला आम्हाला येथे उतरायचे आहे गाडी थांबवा असे म्हणु लागल्या. कंडक्टरने गाडी येथे थांबणार नाही असे सांगितले असता त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. म्हणुन कंडक्टरने कापुरहोळ (ता.भोर) जवळ बस थांबवुन त्यांना उतरू दिले. त्यावेळी दुपारचे १२:३० वाजले होते.

यांनतर फिर्यादी महिलेला आपल्या जवळील दागिने व रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, त्या तीन महिलांनी पैसे गोळा करण्याच्या बहाण्याने बॅग चोरली आहे. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादी महिलेने त्यांचे पती विलास गायकवाड यांना घडलेली हकीकत सांगून खंडाळा येथे बोलावून घेतले. तेथून गायकवाड दांपत्याने पुन्हा मुंबई ला जायचे ठरवले. त्यांनतर त्या मुंबई कडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. यादरम्यान सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही बस चांदणी चौकात आली असता योगायोगाने पुन्हा या महिला फिर्यादी महिला प्रवास करत असलेल्या बसमध्ये चढून आत येऊ लागल्या. यावेळी त्यातील एका महिलेने फिर्यादी गायकवाड यांना बसमध्ये बसलेले पाहिले असता त्या पुन्हा बसमधून उतरू लागल्या.

यावेळी फिर्यादी गायकवाड यांनी त्या महिलेला ओळखले. त्यांनी लगेच आरडा ओरडा करत “हीच ती महिला आहे जिने माझी पैशाची व दागिने असलेली पिशवी चोरली आहे”, असे सांगितले. यांनतर उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवत त्यातील एका महिलेला पकडले. यावेळी तिच्या सोबतच्या इतर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या. शैलजा राजु भोगे (वय ३८ वर्ष, रा. औरंगाबाद, चिखल ठाणा) असे पकडलेल्या महिलेचे नाव असून बावधन पोलिसांनी तिला राजगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदर घटनेबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजित माने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page