भोर शहरात उभारले २६ ठिकाणी सौर पथदिवे, जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर; आमदार संग्राम थोपटेंनी केली होती मागणी
भोर : भोर नगर परिषदेकडून शहरातील २६ ठिकाणी सौर पथदिवे उभारले आहेत. यासाठी शहरातील २५ सार्वजनिक ठिकाणांसह वाघजाई मंदिराची निवड करण्यात आली आहे. यामुळे वीज व मनुष्यबळासाठी होणारा आर्थिक खर्च कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या प्रकल्पाबाबत जून २०२३ मध्ये नगर परिषदेने प्रशासकीय ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आमदार संग्राम थोपटे यांनी जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या बैठकीमध्ये यासाठी निधीची मागणी केली होती. या संपूर्ण प्रकल्पाचे काम संभाजीनगर येथील बालाजी एंटरप्रायजेस कंपनीला देण्यात आले असून, पुढील पाच वर्षे ते या पथदिव्यांची ते देखभाल, दुरुस्ती पाहणार आहेत.
आधुनिक पद्धतीचे पोल
जमिनीत एक चौरस मीटर व आठ फूट खोल फुटिंग करून २५ ठिकाणी नऊ मीटर उंचीचे खांब उभारले आहेत. त्यावर ५० वॅटचे सहा बल्ब, २७० वॅटचे सहा पॅनेल आणि १२ वॅटच्या सहा बॅटऱ्या आहेत. या पोलचे वजन तीनशे किलो आहे.
पंधरा ठिकाणचे दिवे सुरू
सध्या शहरातील पंधरा ठिकाणचे दिवे सुरू झाले असून, उर्वरित ठिकाणचे दिवे आठ दिवसांत सुरू होतील, असे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भोरमधील हा उपक्रम पथदर्शी ठरत असून, यातून विजेची बचत होण्यासोबतच नगर परिषदेचा वीज बिलावरील लाखोंचा खर्चही वाचणार आहे.
कमी उन्हातही होणार चार्ज
एक दिवस सूर्यप्रकाशात पॅनेल चार्ज झाल्यानंतर तीन दिवसांचा ‘बॅकअप’ मिळणार आहे. सायंकाळी साडेसहा ते पहाटे सहा या वेळेत हे दिवे आपोआप प्रकाशमान होणार आहेत. कमी उन्हातही ते चार्ज होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा ते सुरू राहतील, असा दावा कंपनीने केला आहे.
बिघाड झाल्यास मिळणार तत्काळ माहिती
हे संपूर्ण युनिट स्वयंचलित असून, त्याला तीन प्रकारचे ‘इंडिकेटर’ जोडले आहेत. यामध्ये काही बिघाड झाल्यास त्यातून तत्काळ माहिती मिळणार आहे. वाघजाई मंदिर येथे मात्र बारा मीटर उंचीचा व आठ पॅनेल सौर दिव्याची उभारणी केली आहे.