भोरला महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; महावितरण सासवड विभाग अभियंता नितीन पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
भोर : मागील सहा महिन्यांपासून भोर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान छोटे-मोठे उद्योग व्यवसायिक, शेतकरी यांच्यावर परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तसेच भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राजवाडा चौक येथे आज सोमवारी(दि.२४ जून) काही तास आंदोलन छेडण्यात आले.
विजेचा लपंडाव थांबवा, ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करा, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी तसेच छोट्या-मोठ्या व्यवसायांना लागणारी वीज खंडित करू नका, विजेच्या लपंडावामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे होल्टेज कमी जास्त होत असल्याने होणारे नुकसान थांबवा तर या सर्व गोष्टींना जबाबदार असणाऱ्या उपकार्यकारी अभियंता महावितरण भोर यांची तात्काळ बदली करावी या आणि इतर मागण्यांसाठी शहरातील राजवाडा चौकात जिल्हा तसेच भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडून महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
यादरम्यान काही तासानंतर महावितरणचे सासवड विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पवार यांनी आंदोलनकरत्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, पोपट सुके, अतुल किंद्रे, महेश धाडवे, उत्तम थोपटे, आनंदा आंबवले, संपत दरेकर, नरेश चव्हाण, राजाराम तुपे, मधुकर कानडे, शामराव जेधे, गणेश पवार, अमित सागळे, जगदीश किरवे, महेश टापरे, नितीन दामगुडे, तोसिफ आतार आदींसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.