वागजवाडीतून पिकअप गाडीची चोरी; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
किकवी : वागजवाडी(ता. भोर) येथील सिध्देश्वर नगर येथे पार्क करण्यात आलेली पिकअप(एम एच. १२ एफ. डी. ६०७२) गाडी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजी दौलत जाधव(वय ३४ वर्ष, रा. वागजवाडी, ता. भोर) यांनी बुधवारी(दि. ३१ जुलै) राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी जाधव हे वागजवाडी गावचे रहिवासी असून त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दि २८ जुलै रोजी जाधव यांनी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी सिध्देश्वर नगर(वागजवाडी, ता. भोर) येथील राठोड यांच्या घराशेजारी पार्क करत गाडीचे दोन्ही दरवाजे लॉक करून त्यांच्या राहत्या घरी निघुन गेले. त्यानंतर रात्री १० वाजता ते गावातील भजनी मंडळींना त्यांच्या दुसऱ्या मॅक्स गाडीतून घेवून कार्यक्रमासाठी निघून गेले. भजनाचा कार्यक्रम आटोपून पहाटे ३ वाजता पुन्हा वागजवाडी येथे येत असताना त्यांना सिध्देश्वर नगर येथे सायंकाळी पार्क केलेली पिकअप गाडी आढळून आली नाही. यानंतर त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली असून पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण अधिक तपास करीत आहेत.