भोर-शिरवळ मार्गावर उत्रौली गावच्या हद्दीत वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; झाड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
भोर : भोर-शिरवळ मार्गावर उत्रौली(ता.भोर) गावच्या हद्दीत वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज शनिवारी(दि. १३ जुलै) पहाटे ५:३० च्या दरम्यान अचानक हे झाड कोसळले. मोठे झाड अचानक पडल्याने पादचारी, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या रस्त्यावर झाडे पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. या रस्त्यावरील जीर्ण व धोकादायक असलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकावीत अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. वाहनचालकांना तब्बल ४ तास झाले या घटनेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनांसाठी रस्ता काही प्रमाणात मोकळा झाला असून चारचाकी वाहने जाण्यासाठी रस्ता अजूनही पूर्ववत झालेला नाही. झाडाचा घेरा मोठा असल्याने अजूनही झाड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.