पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला फरार शिक्षक अखेर राजगड पोलिसांच्या ताब्यात
कापूरहोळ : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपी शिक्षकास राजगड पोलिसांनी आज मंगळवारी(दि. २५ जून) अखेर ताब्यात घेतले आहे. प्रविण दिनकर बोबडे असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलींना दम देणे तसेच पोक्सो अंतर्गत विनयभंगाच्या गुन्ह्याची राजगड पोलीस ठाण्यात नोंद झाल्यापासून हा आरोपी शिक्षक फरार होता. आरोपीविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अन्वये राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
राजगड पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
यादरम्यान आज मंगळवारी(दि. २५ जून) राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी हा आपल्या राहत्या घरी नातेवाईकांना भेटायला येणार आहे. यांनतर लगेचच पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन पुण्यातील सेशन कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यास २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भोर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींशी त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू असेलल्या प्रविण दिनकर बोबडे याने गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याच शाळेत एकदा मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेविकांनी मुलींना गुड टच व बॅड टच याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही मुलींनी शिक्षक हे आपल्याला बॅड टच करत असतात, याची जाणीव झाली. याबाबत सात मुलींनी त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिल्यावर पाच मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी पालकांनी शिक्षकास सदर घटनेचा जाब विचारून चोप दिला होता.
यादरम्यान राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना माहिती मिळताच त्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार का दाखल केली नाही? याचा जाब विचारत त्यांची तक्रार घेत सर्व जाब जबाब घेऊन या गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल करून घेऊन संबंधित आरोपी शिक्षकावर मुलींना दम देणे तसेच पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला होता. यादरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी महिला शिक्षकांची चौकशी समिती नेमून झाल्या प्रकाराची शहानिशा करून शिक्षकास तातडीने निलंबित केले होते. राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यापासून हा आरोपी फरार होता. गेली तीन महिने राजगड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू होता. या दरम्यान आरोपी प्रवीण बोबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. यांनतर आज अखेर या आरोपीस अटक करण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे.