कर्तव्यात कसूर करून सरपंच पदाचा गैरवापर केल्याबद्दल न्हावी ३२२ येथील तत्कालीन सरपंच अपात्र; पुणे विभागीय आयुक्त यांनी दिले आदेश

सारोळे : कर्तव्यात कसूर करून सरपंच पदाचा गैरवापर केल्याबाबत न्हावी ३२२(ता.भोर) ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच गणेश ज्ञानोबा सोनवणे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचे आदेश डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी पारित केले आहेत. कापूरहोळ(ता.भोर) येथील राजवाडा हॉटेल येथील आयोजित पत्रकार परिषदेत तक्रार अर्जदार ज्ञानेश्वर उर्फ अजय रुपचंद कांबळे(रा. न्हावी ३२२, ता.भोर, जि.पुणे) यांनी यावेळी सर्व गोष्टींचा खुलासा केला. याप्रसंगी रमेश गणगे(बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष), संतोष मोहिते(मा. अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका), संतोष पारठे, गणपत पारठे, मिलिंद तारु, जगन्नाथ सपकाळ, विजय गायकवाड, लव्हाजी मालुसरे, रामचंद्र कोंढाळकर, बाळासाहेब पवार तसेच आदी उपस्थित होते.

नेमके संपूर्ण प्रकरण काय?
सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी ग्रामपंचायत न्हावी ३२२(ता. भोर) येथे गणेश ज्ञानोबा सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले व त्यांनी बहु‌मताने ग्रामपंचायत सरपंच म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी सरपंच पदाच्या कर्तव्यात कसूर व बेकायदेशीर कामे केल्यामुळे त्यांच्या विरोधात अजय रुपचंद कांबळे(उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका) यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या न्यायालयात पदाचा दुरुउपयोग केल्याबद्दल सरपंच व सदस्य पद रद्द करावे म्हणून प्रकरण दाखल केले. त्यामध्ये त्यांनी १५ वा वित्त आयोगाचा निधी हा ग्रामसभा ची मंजुरी न घेता परस्पर खर्च करणे, मासिक सभा न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत मधील रजिस्टर मध्ये खाडाखोड करणे, शासकीय प्लॉट परस्पर विक्री करणे, बनावट ८ अ उतारे मृत्यू दाखले तयार करणे, ग्रामपंचायत कामांमध्ये भ्रष्टाचार करणे अशा अनेक मुद्द्यांसह त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र हे अर्जदार यांच्या वतीने वकील दिगंबर खोपडे व विशाल खोपडे यांनी सुनावणी मध्ये सिद्ध केले.

Advertisement

अर्जदार यांचे विविध तक्रार अर्जाचे अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती(पुरंदर, जि.पुणे) यांच्या मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यांनतर अनेक चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आले की, तत्कालीन सरपंच यांनी कर्तव्यपालनात हयगय, हलगर्जीपणा आदी स्वरुपाची कर्तव्य कसुरी केली आहे. तसेच कर्तव्यकसुरीचे स्वरुप पाहता, गणेश सोनवणे हे सध्या जरी ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर कार्यरत नसले तरी, त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य पदावर कार्यरत ठेवणे उचित नसल्याने सार्वत्रिक निवडणुक २०२१ चे उर्वरित कालावधीसाठी त्यांना पदावरून काढण्यात येत असल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत. याबाबतच्या सर्व गोष्टींचा खुलासा अर्जदार अजय कांबळे आणि आदींनी आज कापूरहोळ(ता.भोर) येथील पत्रकार परिषदेत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page