भोर पोलिसांनी तळेगावातील दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले
पुणे : तळेगाव दाभाडे(ता. मावळ) येथे सराफाच्या दुकानावर दरोडा टाकल्या प्रकरणातील ५ आरोपी भोर-शिरवळ मार्गावरून खाजगी गाडीतून पळून जाताना भोर पोलिसांनी सापळा रचून वडगाव डाळ(ता. भोर) येथे पाठलाग करून दोन आरोपींना गुरुवारी(दि.२७ जून) पकडले. मात्र त्यांचे तीन साथीदार पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रेम सुरेश सोनवणे(वय २९ वर्ष, रा. पवनानगर, ता. मावळ) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. यांनतर भोरचे पोलिस त्याला घेऊन पुण्याला निघून गेले असता त्यानंतर वडगावच्या तरुणांनी पोलिसांसोबत शेतात शोध घेऊन झुडपात लपून बसलेल्या अमित(पूर्ण नाव माहीत नाही) यास पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हदीत गुरुवारी सकाळी एका सराफाच्या दुकानात पाच आरोपींनी दरोड्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिक आल्याने त्यांनी पलायन केले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाचही आरोपी एका इन्होव्हा मोटारीतून भोरकडे आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी भोर पोलिसांना दिली. भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता सहकाऱ्यांसमवेत शहरात नाकाबंदी करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान पाच प्रवासी असलेली एक इनोव्हा मोटार(क्र. एम.एच. १२ ए.पी. ७७७३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाडच्या बाजूकडे जाताना दिसली. पोलिसांची गाडी दिसताच त्या मोटारीने यू टर्न घेऊन शिरवळ बाजूकडे गेली. पोलिसांना लगेचच त्या मोटारीचा पाठलाग सुरु केला. चार-पाच मिनिटातच पाच किलोमीटर अंतर पार केल्यावर वडगाव डाळ गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी त्या मोटारीस ओव्हरटेक करून मोटार थांबवली. पोलिस गाडीतून उत्तरेपर्यंत मोटारीतील पाचही जण डोंगराकडे पळून जाऊ लागले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरु केला. पाच जणांपैकी प्रेम सोनवणे हा पोलिसांच्या हाती लागला. मात्र उर्वरित चार जण पळून गेले. पोलिसांनी प्रेम यास ताब्यात घेऊन शासकीय कार्यवाही करून त्यास तळेगाव पोलिसांकडे सुपूर्त करण्यासाठी पुण्याला घेऊन गेले.
तोपर्यंत तासाभरात वडगावच्या तरुणांनी डोगरामध्ये शोध सुरु केला होता. त्यावेळी त्यांना अमित नावाचा आरोपी मिळाला. त्यासही तळेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या मोटारीतून दरोड्यासाठी लागणारे साहित्यही ताब्यात घेतले. आरोपीना पकडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शैला खोत, चालक हेमंत भिलारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार नवले, पोलिस हवालदार दत्तात्रय खेंगरे, सुनील चव्हाण, अभय बर्गे, अविनाश निगडे व सोनाली इंगुळकर आदीनी सहभाग घेतला.