प्रा. नामदेवराव जाधव यांचा “छत्रपती शासन” हा नवा पक्ष, २८८ जागा लढवणार; भोर विधानसभेसाठी देखील केला उमेदवार जाहीर
पुणे : प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी “छत्रपती शासन” या नवीन पक्षाच्या माध्यमातून २८८ उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे.
छत्रपती शासन हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जातीभेद करण्यात येणार नाही. कोणत्याही उमेदवाराची या कार्यकर्त्यांची जात यामध्ये विचारात घेतली जाणार नाही काम करणारा व पक्षाचे निकष पाळणारा उमेदवार व कार्यकर्ता यांना या मध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळेल मिळेल, अशी घोषणा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाचे संस्थापक अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावरती सखोल सादरीकरण केले. तसेच त्यांनी यावेळी ५ विधानसभा मतदार संघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये भोर विधानसभेसाठी भाऊसाहेब मरगळे, खडकवासलासाठी अविनाश पुजारी, कसबासाठी अरविंद वलेकर, माढासाठी अभिमान लोंढे तसेच नाशिकसाठी बबन शेवाळे यांची नावे जाहीर केली आहेत.
हा पक्ष तरुण तडफदार उमेदवारांना निवडणुकीमध्ये सहभागी करणार आहे. पक्षाने उमेदवार निश्चितीसाठी ५ निकष ठेवले आहेत. उमेदवार ४० पेक्षा जास्त वयाचा नसेल, उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसेल, उमेदवार संविधान मानणारा असेल, उमेदवार हा छत्रपती शासन पक्षाबरोबर एकनिष्ठ असेल व छत्रपति शिवाजी महाराजांना मानणारा असेल हे पाच निकष उमेदवारी देताना पाळण्यात येणार असल्याचे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी यावेळी सांगितले.