भोर तालुक्यातील वरवे खुर्द येथून महिला बेपत्ता
नसरापूर : भोर तालुक्यातील वरवे खुर्द येथून एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. काजल अमित भोरडे(वय २५ वर्ष, रा. वरवे खुर्द, ता. भोर) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे त्यांचे पती अमित सुनिल भोरडे(वय २५ वर्ष, रा. वरवे खुर्द, ता. भोर) यांनी खबर दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता काजल भोरडे यांचे पती अमित भोरडे हे पुण्यातील एका बांधकाम साईड वर नोकरीस आहेत. ते सकाळी ८:३० वाजता रोजच्या प्रमाणे नोकरीस निघून गेले. त्यानंतर आज गुरुवारी(दि. ४ एप्रिल) सकाळी ११:०० वाजता अमित यांचा पत्नी कोमल यांच्याशी फोनवरून संवाद झाला. त्यानंतर ४ वाजता अमित हे घरी आले असता कोमल या राहत्या घरात त्यांना कुठेच आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी काजल यांचा इतरत्र शोध घेतला असता त्यांचा काहीच पत्ता न लागल्यामुळे अखेर राजगड पोलीस स्टेशन येथे धाव घेत त्यांनी सायंकाळी पत्नी बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यानुसार राजगड पोलीस स्टेशन येथे महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची ५ फुट १ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, घरातून बाहेर पडताना अंगावर निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पांढ-या रंगाची लेगींस, त्यावर निळया रंगाची ओडणी, तसेच डाव्या हातावर मोरपीस गोंदलेला आहे.
वरील वर्णनाची महिला कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार चव्हाण यांनी केले आहे.