तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; भोर तालुक्यातील नायगाव येथील घटना
तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; नसरापूर : नायगाव(ता. भोर) येथे रानात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीचा तुटून पडलेल्या विद्युत तारेतील प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी(दि. २४ जुलै) घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथील शेतकरी प्रकाश श्रीपती जाधव हे त्यांच्या म्हशी घेऊन चरण्यासाठी गावाजवळील ओढ्याच्या पुलाजवळ गेले असताना काही म्हशी चरत पुढे गेल्या, परंतु एक म्हैस मागे चरत होती. तेथे वादळीवाऱ्याने झाड विद्युत वाहक तारेवर पडल्याने तार तुटून पडली होती. या तारेतील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जाधव यांना हे लक्षात आल्यावर त्यांनी इतर जनावरांना त्या ठिकाणावरून लांब नेले. तसेच, याबाबत तेथील विद्युत कर्मचारी यांना माहिती दिली. विद्युत कर्मचाऱ्याने तातडीने येऊन विद्युत प्रवाह थांबवला.
या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. पशुधन अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी शवविच्छेदन करून अहवाल दिला, तर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रशांत सणस यांनी, तसेच महसुल कर्मचारी चंदुभाई मुलाणी यांनी देखिल पंचनामा करून अहवाल दिला. प्रकाश जाधव यांनी सांगितले की, म्हैस दिल्ली जातीची असून, तिची किंमत अंदाजे दीड लाख रुपये होती. वेळीच खबरदारी घेतल्याने इतर म्हशी या दुर्घटनेतून वाचल्या. वीज वितरण कंपनीकडून याबाबत नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ निलेश जाधव, गणेश जाधव, गिरीश कोंडे, अभिराज यादव, नितीन शेलार, आकाश यादव, स्थानिक नागरिक उपस्थित होते.