डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील तळजाई टेकडीवर स्वच्छता मोहीम; १११.५ टन कचऱ्याचे संकलन
पुणे : रेवदंडा (ता. अलिबाग जि. रायगड) येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज (दि.३१ मार्च) रोजी पुण्यातील तळजाई टेकडीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ श्री सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रतिष्ठानचे पुणे शहरातून एकूण १६८५ सदस्य सहभागी झाले होते तर इतर ५० नागरिकांनी सहभाग घेतला होता.या स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण १११.५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले यामध्ये ओला कचरा ३१ टन तर सुका कचरा ८०.५ टन कचरा संकलित करण्यात आला. ३३९०४३ स्क्वेअर मीटर तळजाई टेकडीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
तसेच यापूर्वी देखील २ मार्च रोजी पुण्यासह संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शेकडो टन कचरा संकलित करण्यात आला होता.प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन विहीर पुनर्भरण यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी आमदार भिमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेच्या पुणे धनकवडी – सहकार नगर क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त श्रीमती. सुरेखा भणगे, महानगर पालिकेचे अधिकारी विक्रम काथवटे, प्रमोद ढसाळ, धनराज नवले, निवासी वनाधिकारी रोहिणी गाडगे, वनपाल विद्याधर गांधीले, वनरक्षक रोहिणी गाडगे, माजी नगरसेवक वर्षा तापकीर, विष्णु हरिहर, बाळासाहेब धनकवडे, महेश वाबळे, रघुनाथ गवडा आदी उपस्थित होते.