जमीन व्यवहारात आर्थिक फसवणूक; राजगड पोलिसांकडून एकास अटक
नसरापूर : जमिनीचा ठरल्याप्रमाणे व्यवहार करून खरेदीखत न देता पाच लाख वीस हजार रूपये घेऊन नंतर विक्रीस टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी सुषमा विनायक शिंदे (वय ३८, रा. करंजावणे, ता.राजगड (वेल्हे)) यांच्या तक्रारी नुसार राजगड पोलिस ठाण्यात गीतांजली सुरेश पांगारे आणि सुरेश लक्ष्मण पांगारे(दोन्ही रा. सांगवी खुर्द ता. भोर) यांच्यावर जून २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुरेश पांगारे यांस राजगड पोलिसांनी शनिवारी (दि.१७ ऑगस्ट) अटक केली असून आज रविवारी(दि. १८ ऑगस्ट) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
माळेगाव(ता.भोर) येथील गट नंबर ३६६ मधील गिंताजली सुरेश पांगारे यांच्या हिश्शाचे ५.११ आर क्षेत्र गितांजली व त्यांचे पती सुरेश पांगारे यांनी सुषमा विनायक शिंदे यांना १६ लाख ३५ हजार रुपयांना विक्री करण्याचे ठरवले होते. त्यासाठी १२ नोव्हेंबर २०२० रोजी विसार पावती करुन पाच लाख रुपयांचे तीन चेक गितांजली पांगारे यांच्या नावे देण्यात आले व ते पैसे गितांजली यांच्या खात्यावर जमा देखिल झाले. या नंतर कागदपत्रांची पुर्तता करुन दोन महिन्यात खरेदीखत करुन देतो असे पांगारे पती पत्नी यांनी सांगितले होते.
दरम्यान शासकीय मोजणीसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये शिंदे यांनी पांगारे यांना अजुन २० हजार रुपये दिले त्यानंतर बराच कालावधी झाला तरी पांगारे यांनी खरेदीखत करुन न देता टाळाटाळ करु लागले. तेव्हा सुषमा शिंदे यांचे सासरे, सासु व पती यांनी व्यवहारातील मध्यस्थ नामदेव तानाजी झेंडे, निवृत्ती तानाजी झेंडे व दशरथ बबन धावले यांना घेऊन पांगारे यांच्या घरी दोन वेळा बैठक घेऊन या बाबत विचारणा केल्यावर पांगारे यांनी खरेदीखत करुन देतो असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात टाळाटाळच करु लागले. त्यांना खरेदीखत करुन द्या अथवा आमचे ५ लाख २० हजार रुपये परत द्या असे सांगितल्यावर देखिल त्यांनी व्यवहार पुर्ण केला नाही व पैसे देखिल परत दिले नसल्याची फिर्याद सुषमा शिंदे यांनी पांगारे पती पत्नी विरोधात राजगड पोलीस ठाण्यात दिली होती.