धांगवडीतील राजगड ज्ञानपीठच्या परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कापूरहोळ : धांगवडी(ता. भोर) येथील राजगड ज्ञानपीठ विद्यालयाच्या परिसरातील कॅन्टीनजवळ बुधवारी(दि. २८ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास दोन जणांमध्ये झालेल्या मारामारीत एकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी ओम सुभाष येवले(वय २० वर्ष, रा.केंजळ, ता. भोर) याने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार अधिनीयम कायद्या अंतर्गत राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठ विद्यालयाच्या परिसरातील तनपुरे यांच्या कॅन्टीनजवळ फिर्यादी ओम येवले हा उभा होता. तितक्यात तिथे अल्पवयीन आरोपीने येऊन तो येवले याच्याकडे रागाने पाहू लागला. त्यानंतर फिर्यादी येवले याने “तू माझ्याकडे रागाने का पाहतो ?” अशी विचारणा केली असता आरोपीने फिर्यादी येवले यांस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तितक्यात आरोपीने त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने फिर्यादी येवले याच्यावर हल्ला केला. यावेळी सुदैवाने हा कोयता फिर्यादी येवले याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनी कोयता ताब्यात घेत वाद मिटवून दोघांना वेगळे केले. त्यानंतर जखमी येवले यास तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार मयूर निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.