भोर – खड्डेमय रस्ते, जोराचा पाऊस, २० मिनिटात २२ कि.मी.चा रुग्णवाहिकेचा प्रवास; अन तीव्र वेदनेमुळे डॉक्टरांनी केली महिलेची भर रस्त्यातच प्रसूती
सारोळे : भोर तालुक्यातील पेंजळवाडी येथील एका महिलेची आज मंगळवारी(दि. २४ सप्टेंबर) पहाटे ६ वाजून १४ मिनिटांनी भर रस्त्यात रुग्णवाहीकेतच प्रसुती करण्यात आली. काजल रंगराव चव्हाण(वय २२ वर्ष) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने एका बालीकेला जन्म दिला असून, नवजात बालिका आणि आई दोन्हीही सुस्थितीत आहेत. ही प्रसूती करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद कांबळे आणि आशा वर्कर मीना चव्हाण यांचे महिलेच्या नातेवाईंकांनी अभिनंदन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी १०८ क्रमांकावर पेंजळवाडी (ता. भोर) येथील महिलेस प्रसुतीस घेऊन जाण्यासाठी कॉल आला. त्यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहीका ही भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होती. यानंतर तातडीने रुग्णवाहीकेचे चालक सचिन राऊत यांच्यासह डॉ. मिलींद कांबळे यांनी भोर ते पेंजळवाडी हे २२ किलोमीटरचे अंतर केवळ २० मिनिटांमध्येच पार करून गावात पोहोचले.
त्यांनतर त्यांनी गरोदर महिला काजल चव्हाण यांना रुग्णवाहीकेमध्ये घेऊन रुग्णवाहीका भोंगवली (ता. भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाले असताना त्यावेळेस पाऊस पडत होता तसेच रस्त्यावर पाणी, चिखल आणि खड्डे असल्यामुळे रुग्णवाहीका हळुवारपणे चालवावी लागत होती. त्यामुळे भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता.
परंतु महिलेला खूपच तीव्र प्रसुतीवेदना होत असल्यामुळे डॉ. मिलींद कांबळे यांनी रुग्णवाहीका भोंगवली फाट्यापासून शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला थांबवली. आणि ६ वाजून १४ मिनीटांनी रुग्णवाहीकेतच डॉक्टरांनी तिची सुखरुप प्रसुती केली. या महिलेने एका बालीकेला जन्म दिला असून नवजात बालिका आणि आई दोन्हीही सुस्थितीत आहेत. प्रसुती सुरळीत झाल्यानतर डॉक्टरांनी तिला भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून बालिकेचे वजन २.९ किलोग्रॅम आहे. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी डॉक्टर मिलींद कांबळे, आशा वर्कर मीना चव्हाण आणि चालक सचिन राऊत यांचे अभिनंदन केले.