पोलीस उपनिरीक्षकाला “हनीट्रॅप” प्रकरणातील सहभाग भोवला; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली थेट बडतर्फीची कारवाई

पुणे : हनीट्रॅप प्रकरणात सहभागी असलेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीचे आदेश दिले आहेत. काशिनाथ मारुती उभे(वय ५५ वर्ष)  असे बडतर्फ केलेल्या श्रेणी उपनिरीक्षकाचे नाव आहे. उभे यांना कायद्याचे पुरेसे व सखोल ज्ञान असताना समाजविघातक, संशयास्पद, बेशिस्त, बेजबाबदार तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

हनीट्रॅप टोळीतील तिघा महिलांसोबत मिळून उभे यांनी एका व्यक्तीला लॉजवर हाताने मारहाण केली होती. त्यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीकडे पाच लाखांची मागणी करून २० हजार रुपये, मोबाईल काढून घेतला होता. याप्रकरणी उभे आणि आरोपी महिलांवर विश्रामबाग पोलिसांत ३० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना खात्यातून निलंबीत केले होते.

याबाबत कोथरुड परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. त्यांना एका महिलेने बोलावले. ते भेटण्यास आल्यानंतर मात्र त्यांना महिला हक्क आयोगाच्या सदस्य असल्याचे सांगत धमकावले व मारहाण केली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५ लाखाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी जेष्ठाकडून २० हजारांची रोकड आणि मोबाईल काढून घेतला.

Advertisement

तपासात लॉजवरील रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. तेव्हा एका महिलेच्या आधार कार्डची माहिती मिळाली. तर सीसीटीव्हीत गुन्ह्यात वापरलेली गाडीही कैद झाली. त्यानुसार महिलेला ताब्यात घेतले. नंतर तिच्या २ साथीदार महिलांना पकडले. तर दुसरीकडे दुचाकी मुळशी तालुक्यात एका व्यक्तीची होती. त्याच्याकडे चौकशी केली असता ती गाडी उपनिरीक्षक उभे वापरत असल्याचे समजले. महिलांकडे सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. पोलिस उपनिरीक्षक उभे हा गुन्ह्याच्या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

छापा मारणारा ‘तो’ पोलिस अधिकारी
लॉजवरील खोलीत प्रवेश करणारा पोलिस हा उभे होता. उभे यानेच फिर्यादीला दम भरला, उभे याने पोलिस असल्याचा धाक दाखवून मारहाण केली. तर फिर्यादी जेष्ठाला ज्या गाडीतून डांबून घेऊन जाण्यात आले, ती गाडी उभे याचीच होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उभे हा हनी ट्रॅप टोळीत सहभागी होता. यानंतर या संपूर्ण प्रकरणात श्रेणी उपनिरीक्षक काशिनाथ उभे यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page