मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा निवडणुकीत घड्याळ लक्षात ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

नसरापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी बहुमताच्या जोरावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविल्यानंतर आज शनिवारी(दि. २४ फेब्रुवारी) प्रथमच भोर विधानसभा मतदार संघात त्यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा मेळावा शिवशंभो लॉन्स, माळेगाव(नसरापूर) येथे दुपारी पार पडला. लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळें विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरु केली असल्याचे दिसून आले.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, ६५ टक्के लोकांनी मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे सर्व्हेत समोर आले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भोर- वेल्हा शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी देण्याचा प्रयत्न केला. मी कामाचा हापापलेला आहे. ३२ वर्ष मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो. मी कामाचा माणूस आहे, मी कडक बोलत असतो, माझं नाणं खणखणीत वाजत असते. पालकमंत्री पदाचा फायदा १३ तालुक्यातील नागरिकांना व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यांतील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधककांकडून नेहमीच केला जातो. आता महानंद दूध प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महानंद डेअरी कुठेही गेली नाही, गोरेगावलाच आहे. तिकडे येऊन बघा. महानंद तिथेच दिसेल. विरोधकांना बोलायला काही राहील नाही, त्यामुळं ते अशी चर्चा करत आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.

Advertisement

पुढे बोलतांना ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात मी मोठा निधी दिला. अनेकांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांची कारकीर्द तुम्ही बघितलीच आहे. आता योग्य उमेदवार देण्याचं काम महायुती करणार आहे, तुमचं पवित्र मत त्यांना द्यायचं आहे. उद्याचा महायुतीचा उमेदवार जो कुणी असेल त्याला मतदान करा, त्याची निशाणी घड्याळ असणार आहे, विकासाकरता घड्याळाला मतदान करा, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

रूपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या दादांशिवाय पान हालत नाही, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार ह्या अजित दादांमुळेच निवडून येत होत्या. अशी टीका रूपाली चाकणकर यांनी या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा. जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, स्वप्नील कोंडे, किर्तीताई देशमुख, विद्याताई पांगारे, गणेश निगडे, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ तसेच भोर व वेल्हा तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page