संतापजनक! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
पुणे : महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक कठोर पावले उचलले जात असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी(दि. ०३ ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन अज्ञात तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. तसेच तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर तरुणीचे अपहरण करून संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर आज शुक्रवारी(दि. ०४ ऑक्टोबर) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली.
ही तरुणी जखमी अवस्थेत सापडली असून तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केले असून पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली आहेत, असे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय. जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.