महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, 20 नोव्हेंबरला होणार मतदान तर ‘या’ तारखेला मतमोजणी
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदार केंद्र राहतील. या मध्ये ५७ हजार ६०१ ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि ४२ हजार ५८२ शहरी पोलिंग स्टेशन राहतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख इतकी आहे. तसेच तरुण मतदारांची १ कोटी ८५ हजार तरुण मतदार आहेत. तर महाराष्ट्रात २० लाख ९३ हजार तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
तसेच दिव्यांग मतदारांची ६ लाख २ हजार इतकी संख्या आहेत. तर १२ लाख ५ हजार संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. विशेष म्हणजे ८५ वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठीं रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. सर्व पोलिंग स्टेशन २ कि.मी.च्या आत असावेत, असे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.