भोर येथील लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यात शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दिले जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उमेदवारीचे संकेत
भोर : शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावतीने भोर येथे रविवारी(दि. १३ ऑक्टोबर) महिलांसाठी होम मिनिस्टर व लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व महिलांसाठी विविध बक्षिसे व भेटवस्तूंचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शिवसेना महाराष्ट्र प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भोर, वेल्हा, मुळशीतील सुज्ञ मतदार सर्वसामान्यांच्या मनातील निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेब चांदेरे यांना साथ देऊन विजयाचा इतिहास घडवतील. यंदाच्या निवडणुकीत भोर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे काळ्या दगडावरील रेष असल्याचे प्रतिपादन शिवसेना महाराष्ट्र प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे बोलताना म्हणाले की, भोर विधानसभेतील दुर्गम-डोंगरी भागाचा कायापालट करनार असून सर्व सामान्य नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन भविष्यकाळात विकास कामे करणार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करणार असून लाडक्या बहिणींनी या भावाच्या हाताला साथ देऊन परिवर्तन घडवावे, असे ते बोलले.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे, भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, तालुकाप्रमुख दशरथ जाधव, गणेश निगडे, सुनील शेंडकर, आबा करंजवणे, जयश्री शेंडकर, उज्वला पांगारे, राजेंद्र गुठाळे, आरती खोपडे, ओंकार तांदळे, सविता कुंभार, विशाल पवार आदींसह महिला व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.