भोर विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी चार जणांनी भरले उमेदवारी अर्ज; उमेदवारांमध्ये किरण दगडे पाटील, बाळासाहेब चांदेरे व जिवन कोंडेंचा समावेश
भोर : महाराष्ट्रात विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
यादरम्यान भोर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवार(दि. २२ ऑक्टोबर) व बुधवार(दि. २३ ऑक्टोबर) या दोन दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यांनतर गुरुवारी(दि. २४ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यांनतर शुक्रवार(दि. २५ ऑक्टोबर) हा दिवसही निरंक ठरला. यांनतर आज सोमवारी(दि. २८ ऑक्टोबर) ४ उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले असून त्यामध्ये किरण दगडे पाटील, बाळासाहेब चांदेरे, जिवन कोंडे व लक्ष्मण रामकुंभार या चार उमेदवारांचा समावेश आहे. यांनतर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मंगळवार(दि. २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस असल्याने भोर-राजगड-मुळशीतून अजून कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.