शंकर मांडेकरांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी; शिवसेना नेते विनायक राऊतांचे ट्विट
भोर : भोर विधानसभेची जागा ही महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी रात्री उशिरा जाहीर केली.
यानंतर काही वेळातच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी ट्विटर वर पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी “पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, असा उल्लेख केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी गुरुवारी(दि.२४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे आता भोर विधानसभेत महाविकास आघाडी व महायुती यामध्ये आ. संग्राम थोपटे व शंकर मांडेकर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.