एजंट मार्फत लग्न लावत असाल तर सावधान! लग्नाच्या मध्यरात्रीच पैसे आणि दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम
शिरूर : सध्या मुलांना लग्नासाठी मुलगी शोधने हे कठीण झाल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळते. त्यामुळे एजंटांमर्फत लग्न जमवण्याची अनोखी पद्धत सुरू झाली आहे. हे एजंट लोक लग्न ठरवण्याचे भरमसाठ पैसे वर पक्षाकडून उकळताने दिसतात. यामुळे यामधे फसवणुकीचे प्रमाण ही वाढले आहे.
नुकताच शिरूर तालुक्यातील तांदळी येथे एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. तांदळी येथील एका कुटुंबाने एजंटाच्या मदतीने मुलाचे लग्न जमवले होते. यासाठी त्या एजंट व्यक्तीने वरपित्याकडून दोन लाख रुपये रोख घेतले होते. दोन्ही कुटुंबात ठरल्याप्रमाणे तांदळी येथे लग्न सोहळा पार पडला होता. गावकरीही मोठ्या उत्साहाने या शुभकार्यात सहभागी झाले होते. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागिने आणि पैसे घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.
लग्न झाल्यानंतर वधुकडील वऱ्हाडी निघून गेले होते. वधूसोबत रिवाजानुसार एक कलवरी थांबलेली होती. या दोघींनीही लग्नाच्या मध्यरात्री घराला बाहेरून कडी लावत अंगावरील व घरातील दागिन्यांसह चारचाकी गाडीतून धूम ठोकली. नवरीने धूम ठोकल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नघरी एकच गोंधळ उडाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरपित्याने एजंटला फोन केला असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या कुटुंबाने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.