अजित पवार यांना मोठा दिलासा, आयाकर कडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली लवादाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतच निर्णय दिला होता. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्व मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.
आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त केली आहे. दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाकडून याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनित्रा पवार यांची सपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, ही संपत्ती मुक्त करण्यात येणार आहे. लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबाकडे ही संपत्ती सुपूर्द करण्यात येईल.
७ ऑक्टोबर २०२१ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये आयकर विभागाने छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टवरही जप्ती आणल्याचं त्यावेळी समोर आले होते.
आयकर विभागाने संपत्ती जप्त केल्यानंतर अजित पवार यांनी कोर्टात धाव घेतली होती. आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवलेला नाही, असे अजित पवार यांनी कोर्टात सांगतले होते. आता दोन वर्षानंतर याबाबत निर्णय झाला आहे. शुक्रवारी दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाची अपील फेटाळली. अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.