राजगड पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई; अवैध्य गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह साडे एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
नसरापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीत राजगड पोलिसांनी आज शनिवारी(दि. २८ डिसेंबर) दुपारी एकच्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अवैध्य गुटखा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून एम. एच. ०५ ई. एल. ९७८८ असा या ट्रकचा क्रमांक आहे. यामध्ये राज कोल्हापुरी नावाच्या गुटख्याची २१ पोती असून त्याची किंमत अंदाजे ९ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण २१ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अवैध्य गुटखा वाहतूक करणारा एक ट्रक पुणे-सातारा महामार्गावरून राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे. यांनतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी वेगाने सूत्र फिरवत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार यांना याबाबत सूचना दिल्या. यांनतर या पथकाने सापळा रचत कामथडी (ता. भोर) हद्दीत या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. इब्राहिम कुशनुरू(अंदाजे वय ३३ वर्ष, रा. उल्हासनगर, मुंबई) असे या ट्रक चालकाचे नाव आहे. यावेळी आरोपीने सदरचा माल हा कर्नाटक वरून मुंबई कडे घेऊन जात असल्याचे सांगितले. याबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.