मांढरदेवीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भोर मार्गावरील घाटरस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित; उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती

भोर : श्री काळूबाई देवीची यात्रा १२ ते २९ जानेवारी या कालावधीत सुरु होणार आहे. त्यामुळे मांढरदेवी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भोर मार्गावरील घाटरस्ता सुरक्षित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी घाटात वाहने सावकाश चालवून भोर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले आहे. भोर येथील तहसीलदार कार्यालयात श्री काळूबाई यात्रेनिमित्त पूर्वतयारी नियोजन बैठक घेण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते..

भोर-कापूरव्होळ-मांढरदेव-सुरुर फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काळूबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आंबाडखिंड घाटातील काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता सार्वजनिक बांधकाम विभागाने काळूबाई यात्रेसाठी हा रस्ता सुरक्षित केल्याचे सहायक अभियंता प्रकाश जाधव यांनी सांगितले.

Advertisement

तसेच घाटातील वळणावर दिशादर्शक फलक, दोन क्रेन व पाण्याचे टँकर ठेवण्यात येणार आहे. यात्रेसाठी ५९ आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात १० राखीव बेड, चार रुग्णवाहिका, मार्गावरील ग्रामपंचायतींच्या वतीने पिण्याचे पाणी व आरोग्य तपासणी कक्षाची सोय केली जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कापसीकर यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना खरात म्हणाले कि, यात्राकाळात भोर भक्त मांढरदेवला काळूबाईच्या दर्शनासाठी जात असतात. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी भाविकांनी वाहने सावकाश चालवून देवीचे दर्शन घ्यावे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त

अन्नपुरवठा प्रशासन विभागाच्या वतीने या मार्गावरील हॉटेलामधील अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. भोर एसटी आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी होऊन नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page