मांढरदेव यात्रेसाठी समन्वय राखण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश; यात्रा परिसरात तीन दिवस ड्रायडे

मांढरदेव : मांढरगडावरील श्री क्षेत्र काळुबाई देवीची यात्रा दि. १२ ते २९ जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपल्या जबाबदार्‍या पार पाडाव्यात. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे निर्देश सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

मांढरदेव (ता. वाई) येथे एमटीडीसी हॉलमध्ये मांढरदेव यात्रेच्या पूर्वनियोजन तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे, मांढरदेव देवस्थानचे प्रशासकीय विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पुणे जिल्ह्यातील भोर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, वाईचे तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील, भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, यात्रा उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याची संयुक्त जबाबदारी ट्रस्ट, प्रशासन आणि स्थानिकांची आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे. यात्रेसाठी येणारा प्रत्येक भाविक सुखरुपपणे आला पाहिजे, समाधानाने देवीचे दर्शन घेऊन तो परत गेला पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. यात्रेत पशुहत्या होणार नाही याची सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी. या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरता भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यात्रेदरम्यान देवीचे वार व सुट्टीचे दिवस असल्याने स्थानिक व परराज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने मांढरदेव गडावर उपस्थित राहतात. यासाठी उपलब्ध जागा व सुविधांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.

Advertisement

यात्रा कालावधीत सामाजिक सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. उपद्रवमुल्य असणार्‍या शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. खराब दुग्ध व खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी. अन्नपदार्थांचा साठा करुन खराब अन्न पदार्थ विक्री होऊन अन्न विषबाधेच्या घटना घडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध विभागाने विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत. अन्न पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सॅम्पलींग करावे. खाद्यविक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.

तीन दिवस यात्रा परिसरात ड्रायडे…
दि. १२ ते १४ जानेवारी हे तीन दिवस यात्रा परिसरात ड्रायडे घोषित करण्यात येणार असून आजूबाजूच्या गावांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. तसेच उत्सवाचा कालावधी जवळपास १७ दिवसांचा राहणार असल्याने यात्रा कालावधीत २४ तास अखंडित विद्युत पुरवठा ठेवून मागणीप्रमाणे विद्युत जोडणी द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. अपघातप्रवण रस्त्यावरील ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे भेट द्यावी व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page