टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत सीएनजी गॅस वाहतूक करणारा ट्रक पलटी
सारोळे : पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीतील ईफॉटेल समोर आज शनिवारी(दि.२ मार्च) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भरधाव चाललेला सीएनजी गॅस वाहतूक करणारा ट्रक(एम एच ४३ वाय ७६९४) टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पलटी झाला. ट्रक मध्ये संपूर्ण सीएनजी गॅसच्या टाक्या भरलेल्या आहेत. सुदैवाने अपघातात टाकी लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. हा ट्रक पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गाच्या मधोमध पलटी झाला. सुदैवाने या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या रस्त्यावरील वाहतुक सेवा सुरळीत करून देण्याचे काम सुरू केले आहे. ट्रकमध्ये सीएनजी गॅस टाक्या भरलेल्या होत्या. वेगात ट्रक पलटी झाल्यावर सुदैवाने ट्रक मधील सीएनजी गॅसच्या टाक्या लिकेज झाल्या नाहीत. अन्यथा महामार्गवर मोठा अनर्थ घडला असता. महामार्ग पोलिस व राजगड पोलिसांकडून ट्रक बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.