पुणे-सातारा ग्रामीण भागात कंदमुळे म्हणून शरीरास हानिकारक अशा घायपाताच्या खोडाची विक्री….

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:सध्या संपूर्ण देशभरात प्रामुख्याने मंदिरांच्या ठिकाणी कंदमुळं म्हणून एका वनस्पतीची विक्री होत असताना दिसत आहे.बरेच विक्रेते दुचाकीवर हे नाक्यावर,चौकात विकताना दिसतात.हिंदू धर्मात प्रभू रामाला विशेष स्थान असल्याने त्यांचे नाव वापरून काही खोडकर व्यापारी लोकांनी याला रामकंद असे नाव दिल आहे.पण वास्तविक या वनस्पतीचा आणि रामाचा कोणताच संबंध नाही.सध्या ही विकणारी परप्रांतीय टोळी पुणे-सातारा ग्रामीण भागात सक्रिय होताना दिसत आहे. अनेकांनी ही वनस्पती विकत घेऊन खाल्लीही असेल. बरेच लोक ते चवीला अतिशय गोड आणि कंदयुक्त म्हणून खातात. मात्र हा मुळाचा कंद नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं असून कुठेही दिसल्यास ते खाऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मुळात हा कंद नसून घायपात किंवा अनेक ठिकाणी केकताड म्हणून ओळखला जातो. त्याचे खरे नाव अगावे सिसलाना आहे.या वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर एक बांबूसारखा दिसणारा कोंब येतो त्यानंतर त्यावर छोटी छोटी फुले येतात.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो कोंब वाळून जातो.मग ही वनस्पती खोदून काढली जाते.त्यावेळी पांढरट असणारे तिच्या खोडावर काव लावून तिला लालसर रंग दिला जातो.या खोडाला स्वतःची चव नसल्याने तिच्यात गोडवा आणण्यासाठी सक्रिन चा वापर केला जातो.सक्रीनचे अतिसेवन आरोग्यास धोकादायक असल्याने याचं सेवन जास्त प्रमाणात करू नये.खास करून हे लहान मुलांना खायला देणं टाळावे. याबाबत संशोधकांशी चर्चा केली असता. त्यांनी सांगितले की, याच्या अभ्यासासाठी कंदाचे काही काप खरेदी केले. त्याची व्हॅस्कुलर संरचना त्यांनी प्रथम तपासली. यावरून ही एकदल कुळातील वनस्पती असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा काप कंदाचा नसून खोडाचा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर, ही वनस्पती आफ्रिका किंवा इतर खंडातून आयात केलेली नसून भारतातील कोणत्याही माळरानावर असणारे केकताड किंवा घायपात असल्याचेही त्यांना आढळले.संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अगेव्ह सिसालाना किंवा अगेव्ह अमेरिकाना असे आहे. कंदमुळ म्हणून विक्री करणाऱ्या व्यक्ती ही वनस्पती जेव्हा फुलोऱ्यावर येते, त्या वेळेस त्याची पाने काढून टाकतात व त्याचा रंदा मारून गुळगुळीत करतात. तसेच त्यावर मातीचा थर देतात. यामुळे हे कंद असल्यासारखे आपणास भासते. मात्र प्रत्यक्षात हा खोडाचा भाग आहे. हे खोड मुळात गोड नसते. त्यावर सॅक्रिन टाकून ते गोड करण्यात येते. खरेतर या वनस्पतीची पाने वाक तयार करण्यासाठी व नंतर हाच वाक दोर बनवण्यासाठी देण्यात येतो.खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक कंद म्हणून विकला जाणारा हा काप खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक आहे. तरी अशी वनस्पती कोणी विकताना दिसल्यास ती खाण्याची टाळावी.अन्न प्रशासन विभागाने सुद्धा या खुलेआम करणाऱ्या विक्रीवर बंदी घालावी असे सर्व जनतेचे मत आहे.संशोधनाबाबत प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर म्हणाले, या वनस्पतीची शास्त्रीय ओळख पटवण्यासाठी डीएनए बारकोडींग सारखी अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला गेला. या वनस्पतीच्या शोधामुळे भविष्यात या पद्धतीचा वापर करून अनेक वनस्पतींचा शोध लावणे शक्‍य होणार आहे. कंद म्हणून सांगण्यात येणाऱ्या वनस्पतीच्या कापाची जनुकिय चाचणी आम्ही केली. तर याची वैशिष्ट्ये शोधली. उपलब्ध असलेल्या जुनकांच्या सोबत या वैशिष्ट्यपूर्ण जनुकांची तुलना केली. यावरून ही वनस्पती घायपात या कुळातील आहे, हे निश्‍चित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page