साताऱ्यात मिठाईंच्या दुकानावर छापे, तब्बल ४ हजार १०९ लिटर दुधाची विल्हेवाट
सातारा : अन्न औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग आणि वजनमापे विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात वाई, जावली व सातारा तालुक्यासह विविध ठिकाणी छापे टाकून ४ हजार १०९ लिटर दुधाची विल्हेवाट लावण्यात आली.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात किराणा माल व मिठाईची खरेदी होती. याच पदार्थांमध्ये व्यावसायिकांकडून भेसळ होते. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे यांच्या नेतृत्वाखाली अन्न औषधचे इम्रान हवालदार, वंदना रूपनवर, प्रिया वाईकर तर वजनमापेच्या ज्योती पाटील, दुग्ध विकास विभागाचे संजय पवार, अतुल रासकर यांनी तानाजी शिंदे, योगेश अग्रवाल, राजेंद्र आकरे यांनी कारवाईचा धडाका लावला.
गत दोन दिवसांत वाई व जावली तालुक्यात ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. अन्न औषध प्रशासन विभागाने ८२ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तर वजन मापे विभागाने २८ जणांवर कारवाई केली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळ युक्त पदार्थ बाजारात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खवा व दूध हे पदार्थ येत असतात. हे पदार्थ दर्जात्मकच असलेच पाहिजेत. याचा दर्जा कमी असल्यास त्याची विल्हेवाट लावली जाईल. तसेच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. पुढील काही दिवस कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे यांनी सांगितले.