फरार लाचखोर मंडलाधिकारी जयश्री कवडेंचा “खाजगी शूटर” लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; कवडे मात्र वीस दिवसांपासून नॉटरिचेबल
पुणे : थेऊर (ता. हवेली) मंडलाच्या निलंबित लाचखोर व वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या एका गुन्ह्यामुळे मागील गेल्या वीस दिवसांपासून फरार असतानाच, सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी जयश्री कवडे यांच्या एका “खाजगी शूटर”ने कवडे यांच्यासाठी एका प्रकरणात ८० हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी(दि. १ एप्रिल) आणखी एक गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागातच एकच खळबळ उडाली आहे. विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या जयश्री कवडे यांच्या सहकाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थेऊर मंडल अधिकारी यांच्याकरीता ऐंशी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विजय नाईकनवरे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वीस दिवसांच्या आत दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्वीकारण्यासाठी “खाजगी शूटर” ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती. मात्र, आता त्यांच्या खाजगी शूटरवर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.