पब्जीवर ओळख, इन्स्टावर चॅट.. मग सुरू झाला खरा खेळ! साताऱ्यात धक्कादायक प्रकार
सातारा : गेल्या काही वर्षात पब्जी हा ऑनलाईन गेम चांगलाच प्रसिद्ध झाला होता. यातून अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचेही समोर आले आहे. अशाच एका प्रकाराला साताऱ्यातील तरुणी बळी पडली आहे.
पब्जीगेम मधील ओळखीनंतर अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो पाठवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील युवकाने साताऱ्यातील अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील एका लॉजवर मुलीवर अत्याचार झाले असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस ठाणे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने तक्रार दिली. यामध्ये पीडितीने सांगितले की तीन वर्षांपूर्वी पब्जी या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एक तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले इन्टाग्रामवर एकमेकांशी बोलू लागले. यातून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. साल २०२०-२१ मध्ये त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या. या भेटीत त्यांनी काही फोटोग्राफ काढले होते. २०२३ मध्ये तो तरुण पुन्हा तिला भेटायला आला. हा तरुण मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
या भेटीत आरोपी तरुणाने मुलीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेची मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. तोच तरुण दोन दिवसांपूर्वी तिला भेटायला आला. त्यानंतर पीडितेने सर्व प्रकार घरच्यांच्या कानावर घातला. पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे तरुणांना आवाहन
पब्जी असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा विविध चॅटींगचे एप्स आहेत. त्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. या प्रकारांना खासकरुन कॉलेजवयीन तरुण बळी पडताना दिसत आहेत. या तरुणांना आवाहन आहे, की अशा माध्यमातून कोणाशी ओळख झाली. तर काळजी घ्यावी, शहानिशा केल्याशिवाय कुठलही पाऊल उचलू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.