भोर तालुक्यातील आंबवडेत मद्यपान करताना झालेल्या झटापटीत एकाचा संशयास्पद मृत्यू
भोर : भोर तालुक्यातील आंबवडे येथील एका ढाब्यावर मित्रांबरोबर मद्यपान करत असताना वाद निर्माण होऊन झालेल्या झटापटीत एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि. २२ जुलै) सायंकाळी घडली. तुषार शिनगारे(वय ३९ वर्ष, रा. कर्नावड, ता. भोर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तुषार शिनगारे व त्याचे दोन मित्र हे आंबवडे गावातील एका ढाब्यावर मद्यपान करत बसले होते. मद्यपान करता करता तुषार आणि त्याच्या दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आणि या झटापटीत तुषारचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली. घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविला आहे. तूषारच्या मृत्यूमध्ये घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून भोर पोलिसांनी मद्यपान करणाऱ्या इतर दोघांनाही ताब्यात घेतले आहे. तुषारच्या मृतदेहावर कुठेही जखमा नसल्याचे प्राथमिक परिस्थितीत दिसून येत असल्याचे भोर पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल मखरे करीत आहेत.
आंबवडे खोऱ्यात अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट
भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यात अवैध दारू धंद्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव मिळत असून यातून मारामारी सारख्या घटना घडत असल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भोर पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.