अधिकारी रमले पुस्तकांच्या “भिलार” गावात..!
पुणे: नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा साहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना बुधवारी पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली.
हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले. निमित्त होते ‘यशदा’ आयोजित क्षेत्रभेटीचे ! महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे सन २०१७ पासून पुस्तकाचे गाव म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने घोषित केले आहे.
हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असून, शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. येथे बालसाहित्य, स्पर्धा परीक्षा, कादंबरी, कविता, मराठी भाषा व संस्कृती, विज्ञान, नियतकालिके, चरित्रे, इतिहास, स्त्री साहित्य, कथा, लोकसाहित्य, परिवर्तन चळवळ आदी ३५ साहित्यप्रकारानुसार घरे, लॉजेस, शाळा व मंदिरांमध्ये वाचनासाठी पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, महेश ननावरे व पुस्तकाचे गाव प्रकल्प अधिकारी बालाजी हाळदे, राजेश जाधव, उमा शिंदे, संतोष भिलारे, प्रमोद पवार यांनी स्वागत करून प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या चमूने वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली. या वेळी विजय जगताप यांनी स्वागत केले.
सन २०१८ मध्ये सातार्यात झालेल्या ऐतिहासिक राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भिलारला व्यवस्था केली होती, शिवाय त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन भिलारला झाले होते, तेव्हाच्या या दोन्ही बाबी संस्मरणीय आहेत. आमच्यातल्या अनेक सहकार्यांनी सहकुटुंब पुस्तकांच्या मेजवानीस पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे.
– राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक (योजना)