मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त. धाकधूक, टेन्शन वाढलं, अंतरवलीकडे राज्याचं लक्ष

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. १० तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे डॉक्टरही चिंताग्रस्त आहे. नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी तातडीने आपलं उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावं, अशी मागणी मराठा बांधव करीत आहेत.

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत. जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्यपथक अंतरवलीमध्ये दाखल झालं. मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला. आमचे डॉक्टर्स दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहे, तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याच प्रयत्न करत आहेत. त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं.

Advertisement

त्यांची तब्येत चिंतजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना–जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.

मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही, असे खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे बघा. सरकारचे काय डोळे गेलेत का, अक्कल नाही का यांना अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारवर टीका केली.

२० फेब्रुवारीला सरकारचं अधिवेशन
तर २० फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page