काळानुरूप शिक्षकांनी अध्यापनात बदल करावा – गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे
भोर (प्रतिनिधी) : ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना रुजवण्यासाठी शिक्षणातून अपेक्षा केली जाते. अवघे विश्व एक व्हावे ही एकविसाव्या शतकातील महत्त्वाची गरज आहे. शाळा आणि शिक्षण प्रक्रिया हे यासाठी सर्वांत प्रभावी माध्यम आहे. आज शाळांमधून आकार घेणारे आपले भविष्य, आपली भावी पिढी आणि तिच्यावर ‘वसुधैव कुटुंबकम्’ च्या विचार संस्कारांची पेरणी आवश्यक आहे. त्यासाठी काळानुरूप शिक्षकांनी अध्यापनात बदल करावा, असे प्रतिपादन भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले.
अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यमापन या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आर. आर. विद्यालय भोर येथे सुरू आहे, भोर पंचायत समिती विकास गटातील शाळांमधील शिक्षकांसाठीचे हे प्रशिक्षण आहे ,या प्रशिक्षणाचा पहिला दिवस आहे. मानवी संस्कृती आणि इतिहास, पर्यावरणीय समस्यांचे निराकरण, अंधश्रद्धामुक्त सजग समाज निर्मिती ही कोणत्याही देशातील शिक्षणाची त्रिसूत्री असायला हवी आणि ती तशी आहे देखील! मानवी विकासासाठी आवश्यक असलेली मूल्ये विकसित करण्यासाठी कृतिकार्यक्रम विकसित करणे आणि तो राबवणे, विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, विकसित करणे तसेच शिक्षक, पालकांनी सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यासेतर इतर क्षेत्रांना चालना देणे, पायाभूत भाषा साक्षरता व अंकीय साक्षरता यांना राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.असे गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी बोलताना सांगितले.
तज्ञ मार्गदर्शक विषय साधन व्यक्ती लता वाघोले यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले की, अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यमापन हे प्रशिक्षण आहे. हे प्रशिक्षण वेगळे असून शिक्षकांनी मनन व चिंतन करून अध्ययन प्रक्रिया कशी राबवायची आहे. हे या प्रशिक्षणातून शिकवले जात आहे. वर्गात शिक्षक नसताना विद्यार्थी कशाप्रकारे शिकणार आहेत. याचे या प्रशिक्षणात दिले जात आहे. यामुळे स्वयंअध्ययनार्थी संकल्पना दृढ होण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक विषय साधन व्यक्ती लता वाघोले, मनोज पुरंदरे, तालुका समन्वय सुनील गोरड, दीपक खिलारे, ज्ञानेश्वर थोरवे, बाळकृष्ण यादव, सुदेव नलावडे, पद्मजा नाईक महेंद्र खुळे हे तज्ञ मार्गदर्शक आहेत.