पुणे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत पाणी टंचाईची झळ; २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू, प्रत्येक तालुक्यातील टँकरची संख्या किती? वाचा सविस्तर

पुणे : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात आजअखेरपर्यंत १३ पैकी ११ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १७८ गावे आणि एक हजार ३१६ वाड्या-वस्त्यांना २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ही सर्व गावे मिळून चार लाख तीन हजार २०० लोकसंख्या आणि एक लाख ७० हजार ३६४ जनावरे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात मावळ व मुळशी हे अन्य दोन तालुके पहिल्यापासून टँकरमुक्त आहेत. पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आणि ३५३ वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील गावे आणि वाड्यांना ८७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यातील एक लाख सहा हजार ८८१ लोकसंख्येला आणि ७४ हजार ३३६ जनावरांना पाणी टंचाईची झळ बसली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून ही बाब उघड झाली आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ७८ खासगी विहीरी आणि १९ विंधन विहीरी(बोअरवेल) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Advertisement

तालुकानिहाय टँकरची संख्या
–  भोर — ०९
– राजगड(वेल्हे) — ०४
– आंबेगाव — २३
– दौंड — १०
– हवेली — २६
– इंदापूर — १९
– जुन्नर — २०
– खेड — १४
– पुरंदर — ८७
– शिरूर — १२
– बारामती — २८

टँकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या
–  भोर — ११ हजार ८१९
–  राजगड(वेल्हे) — १ हजार ९३७
– आंबेगाव — ४० हजार १५२
– दौंड — १६ हजार ३३८
– हवेली —३२ हजार ३११
– इंदापूर — ७३ हजार ४८०
– जुन्नर —२३ हजार ४७३
– खेड — २९ हजार ८८६
– पुरंदर — १ लाख ६ हजार ८८१
– शिरूर — २२ हजार ८२९
– बारामती — ४३ हजार ८९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page