भाटघर आणि नीरा-देवघर धरणातील पाण्याचा विसर्ग दोन दिवसांत बंद करा, अन्यथा आंदोलन करणार : आमदार संग्राम थोपटे
भोर : मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाटघर आणि नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. दुष्काळाच्या नावाखाली या धरणांतून पूर्वेकडील भगांकरिता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
भोर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठीचा आणि पिण्याच्या पाण्याच्या विचार करता दोन्ही धरणातून जास्त पाणी सोडणे फायदेशीर ठरणार नाही. तसेच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी असलेल्या कालवा समितीची बैठक ही अचानक घेतली जाते आणि आमच्या शिफारशीशिवाय पाणी सोडण्यात येते, असा आरोपही त्यांनी कालवा सल्लागार समितीवर यावेळेस केला. पुढील दोन दिवसांत धरणातून पाणी सोडणे बंद केले नाही तर आंदोलन करण्यात येईन, असा इशारा शनिवारी (दि. १३ जानेवारी) रोजी सकाळी भोर येथील रायरेश्वर कार्यालयातील पत्रकार परिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.
पत्रकार परिषदेत आमदार थोपटे यांनी सांगितले की, भाटघर धरणाची क्षमता २३.७५ टीएमसी तर नीरा-देवघर धरणाची ११.९२ टीएमसी क्षमता आहे. भाटघर धरणाचा पाणीसाठा मागील वर्षी आज अखेर ८९.७८ टक्के होता, तो आज यावर्षी ६७.४४ टक्के आहे. तसेच नीरा-देवघर धरणात मागील वर्षी आज अखेर ९५.०६ टक्के पाणीसाठा होता, तो आज यावर्षी ६१.४५ टक्केच आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. दरवर्षी मात्र हा पाण्याचा विसर्ग डिसेंबर महिन्यात केला जातो. त्यामुळे भोर तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई भासणार आहे. याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा विभागाला २६ डिसेंबरला पत्र दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एक पत्र १० जानेवारीला दिले. तरीसुद्धा धरणातील पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. तसेच वीर धरणातीलही पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणी मिळणार नाही. त्यामुळे या धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग लगेचच थांबवावा, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.