पुणे जिल्ह्यात मतदार यादीत तब्बल १ लाख ४२ हजार जणांचे फोटो सारखेच; दोन ठिकाणी मतदार नाव असणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे : निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदारयादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केली असून जिल्ह्यात २८ हजार दुबार नावे तर समान छायाचित्रे असलेली तब्बल १ लाख ४२ हजार ३४९ मतदार आढळले आहेत.

यासाठी संबंधितांनी मतदारयादीत दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोटिसा पाठविल्या असून या नोटिशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहित असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटिसा पाठविल्या आहेत.

Advertisement

या नोटिशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही देशमुख यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page