१५१ रुपये कांद्याची पट्टी आली, पण आलेली पट्टी गाडी भाडे, हमाली अन् वजनात गेली; हाती मात्र काहीच नाही
शिरूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या हाल सुरु असल्याचे दिसत आहे. कारण केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याने कांद्याला योग्य भाव मिळत नाही. सरकारच्या या निर्णयावर आता शेतकऱ्यांनी शेती करायची कि नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
वाघाळे (ता. शिरुर) येथील एक युवा शेतकरी विशाल बाळासाहेब सोनवणे यांनी चालू वर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेने शेतात कांदे लावगड केली होती. माञ ज्या वेळी कांदा घेऊन बाजारात विक्रीसाठी बाजारात घेऊन गेले त्यावेळी त्यांचा गाडीचे भाडे, हमाली, मापाई यांचा खर्च वजा होता हाती काहीच येत नाही त्यामुळे या युवा शेतक-याने आता शेती करायची का नाही? असा उद्विग्न सवाल सरकारला केला आहे. विशाल सोनावणे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना चिंता व्यक्त केली.
युवा शेतकरी विशाल सोनवणे यांनी चालू वर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेने शेतात कांदे लावगड केली या कांदा लावगडीसाठी त्यांनी एकरी साठ हजार रुपये खर्च केला. माञ ज्या वेळी कांदा काढून शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापा-याला विकला आणि कांदा विक्रीची पट्टी हातात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण कांद्याच्या सहा गोण्यांचे वजन ३०२ किलो भरले होते. व कांद्याला बाजार ५० रुपये प्रती १०० किलो असल्यामुळे १५१ रुपये हाती आले होते. माञ मोटारभाडे १०४ रुपये , हमाली ३३ रुपये , १४.४ मापाई असा खर्च आल्याने विशाल सोनवणे यांना व्यापा-या समोरुन हात हलवत माघारी यावे लागले आहे. एकंदरीत आजच्या घडीला शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेती कसायची का पडीक ठेवायची असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये ऊभा राहिला आहे.