भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांस खंडणी व अपहरणाच्या गुन्ह्याप्रकरणी अटक
भोर : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह एका जणावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र लक्ष्मण पालखे (वय ५४ वर्षे, रा. हातवे बु।।, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहिते यांना अटक करण्यात आली असून आज शनिवारी (६ जानेवारी) त्यांना कोर्टात हजार करण्यात आले असून अधिक तपासासाठी न्यायालयाने संतोष मोहिते यांना मंगळवार पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे भोरचे अध्यक्ष संतोष मोहीते यांनी राजेंद्र पालखे यांच्या मुला कडून दहा हजार रूपये खंडणी घेतली. तसेच राजेंद्र पालखे यांच्या गावातील बचत गटातील महिला यांच्या सांगण्यावरून पालखे हे मोहिते यांच्या किकवी येथील ऑफिसला गेले असता त्या दोघांनी धमकावून संतोष मोहिते यांनी बचत गटाच्या व्यवहारापोटी तो तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी पैशाची मागणी पालखेंकडे केली. त्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने मुलास कृष्नांत राजेंद्र पालखे (वय ३० वर्षे) यास पैशासाठी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे अपहरण केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के करीत आहेत.