पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर!
दोन बायकांच्या भांडणात नवऱ्याचे हाल, पहिल्या पत्नीची नवऱ्यासह सवतीला मारहाण; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कापूरहोळ : दोन लग्न केलेल्या दोन्ही बायकांची आपापसात भांडणे झाल्यावर पहिल्या पत्नीने भाऊ, भावजय, मामा यांना बोलावून नवऱ्यासह सवतीला चोप दिल्याची घटना घडली असून, नवऱ्याने पहिली पत्नी व तिच्या नातेवाइकांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब वैजनाथ शेडगे (वय २३, सध्या रा. इंगवली, ता. भोर, मूळगाव आंबरगाव, ता. धारूर, जि. बीड ) यांची पहिली पत्नी सीमाला तीन मुले आहेत. मात्र, त्याने दोन वर्षांपूर्वी मीनाक्षी सोबत दुसरे लग्न केले. तीला एक मुल आहे. परंतु दोघींचे आपसात पटत नसल्याने दोघींना वेगवेगळे ठेऊन तो सांभाळत होता. सोमवारी (ता. १५) रोजी आळंदे (ता. भोर) येथील पोल्ट्री फार्मसमोर दोघींची जोरदार भांडणे झाली. त्यामधून पहिली पत्नी सीमा हिने तिचा भाऊ आकाश सतीश गालफाडे, उमा सतीश गालफाडे, लक्ष्मी सतीश गालफाडे व मामा अविनाश आलिंदुर कांगळे (सर्व सध्या रा. वारजे माळवाडी, पुणे, मूळगाव मसाखंडेश्वरी, तालुका कळंब जि. उस्मानाबाद) यांना बोलावून घेऊन नवरा बाबासाहेब शेडगे आणि सवत मीनाक्षी हिस लाथाबुक्याने व हातात दगड घेऊन मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शेडगे यांनी चौघांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलिस अंमलदार नाना मदने करीत आहेत.