बारावीच्या विद्यार्थ्यांचा आजपासुन संग्राम; नसरापूर केंद्रामध्ये एच. एस. सी. बोर्ड परीक्षेकरता विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.
नसरापूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला कलाटणी देण्यासाठी बारावीची परीक्षा सर्वात महत्त्वाची ठरते. या परीक्षेचा तणाव जेवढा विद्यार्थ्यांवर असतो तेवढाच त्यांच्या पालकांवरही असतो. इथूनच पुढे पदवी शिक्षणासाठीची वाट निवडून करिअरचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठीचे प्रयत्न सुरु होतात. याच इयत्ता बारावीच्या परीक्षांना आज बुधवार (दि. २१ फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली आहे.
दरवर्षी महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री. शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नसरापूर येथे बारावी च्या बोर्ड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये श्री शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज नसरापूर, दिनकरराव धाडवे पाटील ज्युनिअर कॉलेज सारोळा, अमृता विद्यालय नसरापूर आणि नवसह्याद्री गुरुकुल कॉलेज नायगाव या शाळेचे एकूण ४६६ विद्यार्थी परीक्षेला बसलेलेआहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे १८९, कला शाखेचे १२३, वाणिज्य शाखेचे १२२ आणि व्यवसाय विभागाचे ३२ विद्यार्थी आहेत अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य शिंदे एस. वाय. आणि केंद्र संचालक पुणेकर एस.ए. यांनी दिली.
प्राचार्य शिंदे एस. वाय., पर्यवेक्षक खोपडे ए. आर., केंद्र संचालक पुणेकर एस. ए. उपकेंद्र संचालक मिसाळ वाय. एम., मोहिते एस. एम. आणि सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.