धोकादायक पद्धतीने रस्त्यावरच उभे केलेले विद्युत पोल तात्काळ काढण्याची सरपंच अमोल शिळीमकर यांची मागणी
नसरापूर : तांभाड(ता.भोर) गावातील वाहतुकीसाठी अडसर ठरणारे वीज वितरण कंपनीच्या मार्फत मुजोर ठेकेदाराने नुकतेच बसवलेले वीज पोल तात्काळ स्थलांतरीत करून संबंधित बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच अमोल शिळीमकर यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून तांभाड(ता.भोर) या गावात विजेचे पोल बसवण्याचे काम सुरू आहे. या कामाशी संबंधित ठेकेदाराला सरपंच शिळीमकर यांनी पोल रस्त्यावर उभे न करता रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर उभे करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. परंतु रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर पोल उभा करण्यासाठी मोठा खड्डा खोदावा लागला असता, या वाढत्या कामाचा व्याप टाळण्यासाठी सरपंचांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत या मुजोर ठेकेदाराने पोल रस्त्यावरच उभे केले.
याबाबत माहिती मिळताच सरपंच शिळीमकर हे घटना स्थळी दाखल झाले. परंतु तो पर्यंत पोल उभे करण्यात आले होते. भविष्यात याच रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे करायचे झाल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी हेच पोल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रक सादर करून पैशाची मागणी करतात. ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम तसेच वीज वितरण कंपनीचे नियम डावलून अगदी रस्त्यावरच पोल उभे केल्यामुळे खांबाला वाहने धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विजेच्या तारा रस्त्यावर आल्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पोल तात्काळ काढून टाकण्यासाठी सरपंच अमोल शिळीमकर यांनी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली आहे. तसेच हितून मागे गावच्या हद्दीत नियम डावलून केले गेलेल्या बेकायदेशीर कामाबाबत आवाज उठवणार असल्याचे सुतोवाच सरपंच सरपंच अमोल शिळीमकर यांनी यावेळी केले.