मांढरदेव येथे दर्शनाला गेलेल्या भोर तालुक्यातील माय-लेकींचे बस मध्ये बसताना तब्बल २ लाख रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी
भोर : मांढरदेव(ता.वाई) येथील काळूबाई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भोर तालुक्यातील माय-लेकींचे दोन लाख रुपये किंमतीचे ३.५ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याची घटना रविवारी (दि.४ फेब्रुवारी) दुपारी ४ च्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांढरदेव(ता.वाई) येथील काळूबाई यात्रा दर वर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमेला) भरते. या यात्रेनिमित्त भाविक तब्बल १ महिना देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यातच आज रविवारी सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. त्यातच विजया छगन लिमन( वय ५५ वर्ष, रा. दिवळे, ता. भोर) आणि संगीता रामदास गायकवाड (वय ४० वर्ष, रा. जांभळी, ता. भोर) या माय-लेकी काळूबाई चे दर्शन घेऊन मांढरदेव येथून घरी येण्यासाठी भोरकडे निघालेल्या एस टी बस(एम एच १४ बी टी ३४८०) मध्ये बसल्या. बस मध्ये बसताना गर्दी असल्यामुळे त्यांनी गर्दी मधून आतमध्ये प्रवेश केला. बस काही किमी पुढे गेल्यावर संगीता गायकवाड यांच्या गळ्यातील २ तोळे तर विजया लिमन यांच्या १.५ तोळे वजनाचा सोन्याचा घंटन गळ्यात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब एस टी बस कंडक्टर यांस सांगितली. बसमधीलच कोणीतरी दागिने चोरल्याचा संशय त्या दोघींना आला. त्यामुळे त्यांनी बस भोर पोलीस स्टेशन येथे नेण्यास बस चालकास विनंती केली.
भोर-मांढरदेव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे व यात्रेनिमित्त रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे ६:१५ वाजता एस टी बस भोर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली. बस चालकाने व महिलांनी घडलेल्या घटनेची माहिती भोर पोलिसांना दिली. तत्काळ क्षणाचाही विलंब न करता भोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अंमलदार अतुल मोरे, झेंडे, इंगुळकर मॅडम आणि होमगार्ड शेटे यांनी बसमधील प्रत्येक व्यक्तीची व त्यांच्या जवळील असणाऱ्या सामानाची झडती घेतली. परंतु दागिने कुठेच आढळून आले नाहीत. यावरून बसमधे प्रवेश करतानाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या देवी मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी हातसफाई करत पोलिसांना आव्हान दिले आहे. मांढरदेवी देवस्थान हे वाई पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्यामुळे घडलेल्या प्रकाराची तक्रार वाई पोलिसांकडे करण्यासाठी या महिला गेल्या असल्याची माहिती मिळाली आहे.